मुख्य सामग्रीवर वगळा

छत्रपति शिवाजी महाराज जावळीच्या खोऱ्यात 🚩

#छत्रपति_शिवाजी_महाराज_जावळीच्या_खोऱ्यात 🚩

जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्‍वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे!

तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!’’ जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्‍या चंद्रराव मोर्‍यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्‍वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्‍यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोर्‍यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. ‘चंद्रराव’ हा मोर्‍यांचा पिढीजात किताब होता.

आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोर्‍यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे ‘चंद्रराव’ झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोर्‍यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला लागले आणि चंद्रराव मोर्‍यांनी महाराजांविरुद्ध सवतासुभा मांडला. चंद्रराव मोरे महाराजांचे उपकार विसरले.

दौलतीचा खांब होण्याऐवजी मोर्‍यांनी दौलतीलाच आव्हान दिले. ‘‘...तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्‍वर! त्याच्या आणि बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. येता जावळी, जाता गोवळी?’’ राजगडाच्या सदरेवर मोर्‍यांनी उद्दामपणे लिहिलेले पत्र पंतांनी राजांना वाचून दाखविले. हा मग्रुरीचा जबाब ऐकून महाराज संतापले. मोर्‍यांना अखेरची संधी मिळावी म्हणून महाराजांनी पुन्हा एक पत्र मोर्‍यांना धाडलं ‘जावळी खाली करोन, हात रुमालांनी बांधून भेटीस येणे!’ पण चंद्रराव व हणमंतराव गुर्मीला आले. कारणच तसे होते. कारण त्यांच्या ताब्यात होते जावळीचे खोरे!

जावळी म्हणजे वाघाची जाळी. जावळीचे खोरे म्हणजे महाबिकट मुलुख. जावळीच्या खोर्‍यात उतरणे म्हणजे मृत्यूच्या खाईत उतरण्यासारखे होते. याच जावळीच्या आणि आपल्या पायदळाच्या गुर्मीत मोर्‍यांनी राजांना उलट उत्तर पाठविले ‘‘...जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही!’’

मोर्‍यांच्या पत्राची थैली राजगडाच्या सदरेवर उघडली गेली आणि महाराजांच्या संतापाचा कडेलोट झाला. महाराजांनी ओळखलं, मोर्‍यांस मारल्याविना स्वराज्य साधत नाही. जावळी स्वराज्यात येत नाही. जगतगुरू तुकोबा मोरे स्वराज्य ‘प्रतिपश्चंद्रलेखेव’ होण्याकरिता महाराजांना मदत करीत होते आणि जावळीचे मोरे स्वराज्याच्या मुळावरच उठले होते.

मराठ्यांचे दुर्दैव, दुसरं काय! महाराजांचे कान्होजी जेधे, हैबतराव शिळीमकर, संभाजी कावजी कोंढाळकर, नांदलनाईक यांना तातडीचे हुकूम सुटले. निवडक धारकरी जावळीच्या कीर्र जंगलात घुसले. एकदम भयंकर कालवा उठला. चर्तुबेट, जोर, शिवथर आणि खुद्द जावळीवर एकाचवेळी मराठ्यांचा छापा पडला.

चंद्रराव, प्रतापराव, हणमंतराव आणि सगळी मोरे मंडळी धावली. दोन्ही बाजूंकडून मराठेच आपापसात लढू लागले, पण स्वराज्यासाठी त्यांचा नाइलाज होता. कापाकापी सुरू झाली. किंकाळ्यांनी जावळी कोंदली. संभाजी कावजी कोंढाळकरांनी हणमंतराव मोरे ठार केला. प्रतापराव मोर्‍यांनी लपत छपत विजापूरचा रस्ता धरला. खासा चंद्रराव जावळी हातची जातेय हे पाहून रायरीकडे पळाला.

जावळी काबीज झाल्यावर जावळीजवळचे चंद्रगड, मकरंदगड, सोनगड, चांभारगड हेही किल्ले स्वराज्यात सामील झाले. जावळीची जागा कमालीची बिकट तेवढीच अजिंक्य! महाराजांनी आपला खजिना ठेवण्याकरिता हीच जागा पसंत केली. जावळी खोर्‍याला खेटून असलेल्या पारघाटाच्या नाकासमोरील भोरप्या डोंगरावर महाराजांनी तटा-बुरुजाचे शेलापागोटे चढविले आणि तयार झाला जावळी खोर्‍याचा रखवालदार ‘किल्ले प्रतापगड’! याच प्रतापगडाने आणि जावळीच्या खोर्‍याने महाराजांना अफझलयुद्धात प्रचंड यश मिळवून दिले.

असे हे जावळीचे खोरे महाबळेश्‍वराच्या पश्‍चिमेकडे आहे. महाबळेश्‍वराहून कोकणात म्हणजे महाडकडे उतरणार्‍या गाडीरस्त्याच्या दोन्ही बाजूस जावळीचे खोरे आहे. महाबळेश्‍वर उतरून प्रतापगडाकडे जाण्याच्या रस्त्याच्या उजव्या बाजूस जावळीचा फाटा आहे. येथून जवळच मोर्‍यांची जावळी आहे. गावात मोर्‍यांच्या कुलदैवतांचे मंदिर आहे. जवळच मोर्‍यांच्या गादीचे ठिकाण आहे.

🚩🙏🙏 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🙏🙏🚩

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रगल्भता म्हणजे काय?(what is maturity?)

· प्रगल्भता म्हणजे काय? · (what is MATURITY) · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता. · प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता. · प्रगल्भता म्हणजे ...

Hambirrao mohite: the great maratha worrier ....... सरसेनापती हंबीरराव मोहिते

कराडमधील तळबीड या गावची पाटीलकी सांभाळणाऱ्या मोहिते घराण्यात इसवी सन १६४० साली हंसाजी मोहितेंचा जन्म झाला झाला होता. हंसाजींचे वडील संभाजी मोहिते शहाजी राजांच्या सैन्यात सहहवालदार होते. संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत लावून दिला होता तर हंसाजींच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या. इसवी सन १६७४ साली आदिलशाही सरदार बहलोलखान याच्यासोबत लढाईत सेनापती प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले. सेनापती पडल्याची वार्ता कळताच प्रतापरावांच्या फौजेत सरदार असलेल्या हंसाजी मोहिते यांनी सर्व सैनिकांचे मनोबल ढासळू न देता त्यांच्यात हिंमत निर्माण केली आणि बहलोल खानावर आक्रमण करून त्याला विजापूर पर्यंत पिटाळून लावले. हंसाजींच्या या पराक्रमाने शिवाजी महाराजांना त्यांच्यात शहाणा, सबुरीचा सेनानी दिसला. महाराजांनी त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांना हंबीरराव हा किताब दिला आणि आपला सेनापती म्हणून निवडले. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी दोन वर्ष मोघल व आदिलशाही भागात स्वारी करून मोठी लूट ज...